मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) ज्ञानेश कुमार यांच्या निवडणूक आयोगातील बेबंदशाहीविरोधात अवघ्या देशामध्ये संतापाचा उद्रेक झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये आता ठाकरे बंधूंनीसुद्धा एल्गार पुकारला आहे. 4 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये विराट मोर्चा निघणार असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज (29 सप्टेंबर) ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मोर्चाची दिशा सांगितली. राज ठाकरे म्हणाले, “चार तारखेला हा संयुक्त मोर्चा निघेल. भायखळा वरून हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथे व्यासपीठ असेल आणि तिथे त्याचे रूपांतर सभेमध्ये होईल. सकाळी दहा वाजताची वेळ आहे. मोर्चात काय बोलायचे ते आम्ही बोलू. परंतु, हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. गेली अनेक वर्ष या विषयांवर आम्ही बोलत आलोय. 2017-18 मध्ये मी अनेक नेत्यांना या संदर्भात भेटलो होतो. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मी भेटलो होतो, या विषयावर सविस्तर बोलणं चार तारखेला होईल.”
या मोर्चात पक्षीय राजकारण नसेल आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना व्यासपीठावर यायचं असेल तर ते देखील येऊ शकतात. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षातला जो कारभार आहे त्या विरोधात हा मोर्चा आहे.”
या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. यात सर्वांच्या हातात तिरंगाच असणार आहे. हा विषय या देशातील लोकशाही वाचवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे सर्वांच्या हातात तिरंगाच असेल.





