महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातील बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना खीळ; संजय मोरे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.
सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल संपली. सोसायटी मतदारसंघ, राखीव मतदारसंघ तसेच इतर मतदारसंघांतून विविध उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेली ही महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि किसन वीर साहेब यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या या बँकेचे प्रतिनिधित्व यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी केले आहे. त्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्राबरोबरच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बँकेच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार तसेच विविध राजकीय गटांतील मान्यवरांकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. काही मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या प्रयत्नांना अडथळे निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात चुरस वाढणार?
महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ बिनविरोध करण्याच्या सत्ताधारी गटाच्या प्रयत्नांना संजय मोरे यांच्या उमेदवारीमुळे आव्हान निर्माण झाले आहे. पंचायत समितीचे उपसभापती तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या संजय मोरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मोरे यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान संचालकांसमोरील आव्हान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या कार्याची आठवण
या निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या कार्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या कार्याची आजही शेतकरी वर्गात आठवण काढली जाते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाला या निवडणुकीच्या निमित्ताने योग्य उत्तर मिळावे, अशी अपेक्षा सामान्य शेतकऱ्यांच्या मनातून व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांशी निष्ठा असलेले नेतृत्व महाबळेश्वरच्या मातीतून बँकेच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या भावना, स्थानिक नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व या मुद्द्यांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच या राजकीय घडामोडीत अमित कदम यांची भूमिका आणि मोरे यांना मिळणारा पाठिंबा याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.यापूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकीय समीकरणांमध्ये अमित कदम यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातील ही लढत केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता अर्जांची छाननी, माघारीची मुदत आणि अंतिम उमेदवारांची यादी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात अखेर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, यावर या निवडणुकीची पुढील दिशा अवलंबून असेल.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री अजित संकपाळ ,युवा नेते सचिन कदम ,गणेश उत्तेकर ,आनंद धनावडे,विश्वनाथ दादा संकपाळ ,विश्वनाथ मोरे ,राम संकपाळ ,सुनील संकपाळ , विशाल संकपाळ व रोहित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.






